Dhule : राज्याच्या महाराष्ट्र लॉजिस्टिक धोरण 2024 अंतर्गत धुळे जिल्ह्यात प्रस्तावित लॉजिस्टिक पार्कसाठी योग्य जागेची लवकरात लवकर अंतिम निश्चिती करण्याच्या सूचना जिल्हाधिकारी भाग्यश्री विसपुते यांनी दिल्या.
जिल्हाधिकारी कार्यालयातील सातपुडा सभागृहात आज जिल्हास्तरीय समन्वय समितीची बैठक पार पडली. या बैठकीला उपजिल्हाधिकारी संजय बागडे, महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ (MIDC) चे प्रादेशिक अधिकारी दिगंबर पारधी, जिल्हा उद्योग केंद्राचे महाव्यवस्थापक संतोष गवळी, रेल्वे स्टेशन प्रबंधक संतोष जाधव, खानदेश इंडस्ट्रियलचे अध्यक्ष भरत अग्रवाल यांच्यासह विविध विभागांचे अधिकारी उपस्थित होते.
जिल्हाधिकारी विसपुते यांनी सांगितले की, प्रस्तावित लॉजिस्टिक पार्कमुळे मालवाहतूक व्यवस्थेला गती मिळेल आणि उद्योग क्षेत्राला मोठी चालना मिळणार आहे. तसेच, या प्रकल्पामुळे स्थानिक पातळीवर मोठ्या प्रमाणात रोजगार निर्मिती होण्यास मदत होईल. त्यामुळे सर्व संबंधित विभागांनी समन्वय साधून जागेची निवड प्रक्रिया तत्काळ पूर्ण करावी, असे त्यांनी स्पष्ट केले.
त्या पुढे म्हणाल्या की, समितीने संभाव्य जागांची प्रत्यक्ष पाहणी करून तेथील रस्ते, दळणवळण सुविधा, रेल्वे संपर्क आणि इतर पायाभूत सुविधा यांचे मूल्यांकन करावे. त्यानंतर लॉजिस्टिक पार्कसाठी योग्य जागेची अंतिम निवड करण्यात यावी.
यावेळी MIDC चे प्रादेशिक अधिकारी दिगंबर पारधी यांनी प्रस्तावित लॉजिस्टिक पार्कबाबत माहिती सादर केली. समितीची अंतिम मंजुरी मिळाल्यानंतर हा प्रस्ताव पुढील कार्यवाहीसाठी संचालक मंडळाकडे पाठविण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले.
बैठकीत लॉजिस्टिक पार्कसाठी आवश्यक निकषांवर सविस्तर चर्चा झाली. विशेषतः प्रस्तावित जागा राष्ट्रीय महामार्ग, रेल्वे मार्ग, औद्योगिक वसाहती आणि इतर मूलभूत सुविधांच्या दृष्टीने सोयीची असावी, यावर भर देण्यात आला.










