नाशिक येथील भोंदूबाबा अशोक खरात यांच्या आश्रमाला शासनामार्फत दीड कोटी रुपयांचा निधी देण्यात आल्याचा गंभीर आरोप माजी आमदार अनिल गोटे यांनी केला असून, हा निधी कोणत्या आधारावर देण्यात आला याची चौकशी करून संबंधित मंत्र्यांची जबाबदारी निश्चित करावी, अशी मागणी त्यांनी केली आहे.
तसेच या संपूर्ण प्रकरणाची चौकशी राज्य किंवा केंद्राच्या गृह विभागाकडून न करता सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायाधीशांच्या अध्यक्षतेखाली समिती नेमून करावी, अशी मागणीही त्यांनी पत्रकार परिषदेत केली.
आश्रमाला निधी म्हणजे शासन मान्यता – गोटे
धुळ्यात आयोजित पत्रकार परिषदेत माजी आमदार अनिल गोटे यांनी सांगितले की, शासनाने दीड कोटी रुपयांचा निधी देऊन या आश्रमाला अप्रत्यक्षपणे शासन मान्यता दिली. त्यामुळेच अनेक लोक या आश्रमाच्या प्रभावाखाली गेले.
हा निधी नेमका कोणत्या योजनेतून, कोणत्या निकषांवर आणि कोणाच्या शिफारशीवर देण्यात आला, याचा जाहीर खुलासा झाला पाहिजे, अशी मागणी त्यांनी केली.
अमित शहा आणि देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत छायाचित्रांमुळे चौकशीची मागणी
भोंदूबाबा अशोक खरात यांच्यासोबत देशाचे गृहमंत्री अमित शहा आणि राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची छायाचित्रे समोर आल्याचे सांगत गोटे यांनी पारदर्शक चौकशीसाठी सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायाधीशांच्या अध्यक्षतेखाली समिती नेमावी, अशी मागणी केली.
या प्रकरणाची व्याप्ती मोठी असल्याने मर्यादित चौकशी न करता वेळमर्यादा ठरवून चौकशी अहवाल सादर करावा, असेही त्यांनी म्हटले.
भोंदूबाबांमुळे धर्म बदनाम – गोटे
गोटे यांनी सांगितले की, धर्माच्या नावाखाली अनेक भोंदूबाबांनी गुन्हेगारी कृत्ये केली आहेत. त्यांनी आसाराम बापू, राम रहीम यांसारख्या प्रकरणांचा उल्लेख करत अशा भोंदूबाबांचा हिंदू धर्माशी कोणताही संबंध नसल्याचे सांगितले.
वारकरी संप्रदायातील संत ज्ञानेश्वर, संत तुकाराम, समर्थ रामदास, संत एकनाथ, स्वामी समर्थ यांनी समाज परिवर्तनासाठी काम केले, मात्र भोंदूबाबा धर्म बदनाम करत आहेत, असे ते म्हणाले.
पर्यटन विभागाने निधी का दिला?
गोटे यांनी आरोप केला की, मंत्री जयकुमार रावल यांच्या अधिपत्याखालील पर्यटन विभागाने अशोक खरात यांच्या खाजगी संस्थेला दीड कोटी रुपयांचा निधी दिला. हा निधी देताना कोणते निकष लावले गेले, हा मोठा प्रश्न असल्याचे त्यांनी सांगितले.
गृहमंत्री पदाचा राजीनामा देण्याची मागणी
नाशिकमध्ये पोलीस आयुक्त, विशेष पोलीस महासंचालक कार्यालय, पोलीस अकॅडमी असूनही 2003 पासून अशोक खरात यांचे उद्योग सुरू होते. याची माहिती शासनाला नसणे शक्य नाही, असे सांगत गोटे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नैतिक जबाबदारी स्वीकारून गृहमंत्री पदाचा राजीनामा द्यावा, अशी मागणी केली.
अंधश्रद्धेच्या व्यवसायावर कारवाईची मागणी
गोटे यांनी सांगितले की, भोंदूबाबांच्या आश्रमात गेलेल्या सर्व लोकांची चौकशी झाली पाहिजे. अन्यथा अशा प्रकारचे भोंदूबाबा तयार होणे थांबणार नाही.
धुळ्याच्या धर्मभास्कर वाघ प्रकरणापासून ते नाशिकमधील विविध आर्थिक व गुन्हेगारी प्रकरणांपर्यंत अनेक प्रकरणांचे पुढे काय झाले, याची माहिती जनतेसमोर यावी, अशी मागणीही त्यांनी केली.











